सोयीचा राष्ट्रवाद व धर्मनिरपेक्षता
मागील संपूर्ण आठवडा देशभरात
गाजवला तो एका विद्यापीठाने. वास्तविक पाहता
माध्यमातील जागा व्यापणे
हे खरे तर सिनेमातील नट, नट्या,राजकारणी, खेळाडू, झालेच
तर काही वलयांकित
समाजसेवक यांचा हक्क.
आपल्या देशात
विद्यापीठाने स्थान मिळविणे
हि खरे तर दुर्मिळ बाब. पण हे झाले.
काहींच्या मते जेएनयू
मधील लढाई हे म्हणजे अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी लढले
जाणारे युद्ध. तर
काहींसाठी भारताच्या राष्ट्ररचनेवरील घाला.
तर बरेचसे लोक
हे जेएनयू या
शब्दापासून अनभिज्ञ. तेथे काही
देशविरोधी घोषणा दिल्या
गेल्या, इतकेच काय
ते सामान्य माणसाला
वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून कळाले. पण
जेएनयू म्हणजे काय
, व असे या विद्यापीठाच्या प्रांगणातच का घडले,
हे मात्र बऱ्याच
जणांना माहित नाही.
जेएनयू अर्थात "जवाहरलाल नेहरू
विद्यापीठाची" स्थापना १९६९ साली
संसदेच्या कायद्यान्वये झाली. आजघडीला
NAAC कडून देशात सर्वात
जास्त नामांकन मिळवणारे
हे एक विद्यापीठ
आहे. देशभरातील सर्वोत्तम
व हुशार विद्यार्थी
या ख्यातकीर्त विद्यापीठात
शिक्षण घेण्याकरिता येतात.
भारतातील महत्वाचे राजकीय नेते,
पत्रकार, नोकरशहा देण्याची या
विद्यापीठाची दीर्घ प्रशंसनीय
परंपरा आहे. मग ते
कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंग
असोत अथवा केंद्रीय
मंत्री भाजप नेत्या
निर्मला सीतारामन. सीएनबीसी
वरील उदयन मुखर्जी
असोत वा प्रख्यात
पत्रकार पी. साईनाथ… "आप"
पक्षाची थिंक टंक
म्हणून ओळखले जाणारे
"योगेंद्र यादव" याच मुशीतून
तयार झालेले. पण
या विद्यापीठाची ओळख
इतकीच मर्यादित नाही.
"डाव्या विचारवंतांचा बालेकिल्ला " हि
या विद्यापीठाची खरी
ओळख. सीताराम येचुरी
व प्रकाश करात
हे देखील याच
विद्यापीठाचे विद्यार्थी. प्रकाश करात
यांनी तर या विद्यापीठाची घटना लिहिण्यात
महत्वाची भूमिका बजावली
होती. वाद या विद्यापीठाला नवीन नाहीत.
इ. स . २०००
मधे येथे आयोजित
केलेल्या एका सांस्कृतिक
कार्यक्रमात पाकिस्तानी कवी श्री. फराज
अहमद व फहमिदा
रियाझ यांना आमंत्रित
करण्यात आले होते.
कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर
तेव्हा या कार्यक्रमावर
भारतविरोधी असा शिक्का
मारण्यात आला होता.
इ. स . २०१०
मधे छत्तीसगढ मधील
दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांच्या
हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस
दलाचे सुमारे ७६
जवान शहीद झाल्यावर
याच विद्यापीठात आयोजित
करण्यात आलेल्या एका
कार्यक्रमात भारत सरकारच्या
"ऑपरेशन ग्रीन हंट"
बद्दल "सरकारचाच निषेध करण्यात
आला. विशेष म्हणजे
यात हुतात्मा जवानांबद्दल
चकार शब्ददेखील नव्हता.
या सर्व पार्श्वभूमीवर
आत्ता घडलेली घटना
हि आश्चर्य वाटण्याजोगी
निश्चितच नाही. अफजल
गुरु ची "शहादत"
साजरी करण्याकरिता विद्यापीठात
कार्यक्रम होतो यातच
सारे आले… नंतर घोषणा
देणारे बाहेरील "काश्मिरी"
विद्यार्थी होते, जेएनयू
मधील नाही या गोष्टीला फारसा अर्थ
उरत नाही. त्यामुळे
या घटनेचा निषेध
करावा तितका थोडाच… त्यात या प्रकरणाला
दिलेली राष्ट्रवादाची झालर.
आणि एकदा राष्ट्रवाद,
देशभक्ती असे काही
आले कि भल्या
भल्या विचारवंतांची बुद्धी
खुंटते. आणि मग आपल्या या
सोयीच्या राष्ट्रवादाचे आश्चर्य वाटल्यावाचून
राहत नाही.
भारताच्या चौथ्या पंतप्रधान
श्रीमती. इंदिरा गांधी यांचा
दि. ३१/१०/१९८४ रोजी
सकाळी त्यांच्याच अंगरक्षकांनी
खून केला. "ऑपरेशन
ब्लूस्टार" राबवल्याबद्दलचा राग "सतवंत सिंग
" व "बियांत सिंग"
यांच्या बंदुकांमधून व्यक्त
झाला. आज संपूर्ण
देश मान्य करेल
कि जर आदरणीय
इंदिराजींनी "ऑपरेशन ब्लूस्टार"
राबवण्याचा धाडसी निर्णय
घेतला नसता तर कदाचित भारताची
अखंडता धोक्यात आली
असती. पण केवळ टोकाच्या अस्मिता वादातून
भारत एका पंतप्रधानांना
मुकला. नुकताच पंजाब
मध्ये दिवंगत पंतप्रधान
इंदिरा गांधींच्या मारेकर्यांवर
आधारित एक चित्रपट
प्रदर्शित झाला. "कौम दे हिरे " असे त्याचे नाव. या चित्रपटात
सतवंत सिंग, बियंत
सिंग व केहार सिंग यांचे
उद्दात्तीकरण करण्यात आले असून
त्यांना समाजाचे हिरे
असे म्हटले आहे.
हा चित्रपट प्रारंभी
प्रदर्शित झाला पण
त्यावर नंतर बंदी
आणण्यात आली. आजही
हा चित्रपट यु
ट्यूब वर कुणीही
विनासायास पाहू शकतो.
हा चित्रपट निर्मिती
करणाऱ्या कलाकारांना अथवा दर्शकांना
कुणी देशद्रोही म्हटल्याचे
माझ्या तरी कुठे
वाचनात आले नाही.
इतकेच नव्हे, तर
अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला
शस्त्र व अतिरेक्यांचा
अड्डा करून संपूर्ण
देशास वेठीस धरणाऱ्या,
भारताचे विभाजन करून
नवीन देश "खलिस्तान"
ची निर्मिती करू
पाहणाऱ्या व हजारो
भारतीयांच्या नृशंस हत्याकांडास
जबाबदार असणाऱ्या "जर्नेलसिंग
भिंद्रनवाले" यांस "शहीद" ठरवून
त्याच्या तसबिरी विकणारे
आणि विकत घेणारे
यांना कुठल्या राष्ट्रवादाच्या
व्याख्येत बसवायचे हे मला तरी उमगत
नाही. "बियंत सिंग"
या मारेकऱ्याचे तर
दोन नातेवाईक, त्याची
धर्मपत्नी व वडील
सहानुभूतीच्या जोरावर लोकसभेवर
निवडले गेले. आजही
या मारेकऱ्याची पुण्यतिथी
पंजाब मधे साजरी
होते. आता या राष्ट्रवादाचे काय करायचे,
ते ठरवले पाहिजे.
आता वळूयात पुढील
भाग अर्थात भारताचे
त्यानंतरचे पंतप्रधान श्री. राजीव गांधी
यांची हत्या. लिबरेशन
टायगर्स ऑफ तमिळ इलम" च्या अतिरेक्यांनी
राजीव गांधी यांनी श्रीलंकेत
शांतीसेना पाठवण्याच्या कृत्याचा निषेध म्हणून दि. २१ मे १९९१ रोजी तमिळनाडूतील श्रीपेरुम्ब्दूर
येथे मानवी बॉम्बचा वापर करून हत्या केली. आता या मारेकऱ्याची फाशी ची शिक्षा जन्मठेपेत
परावर्तीत करण्यात यावी असा निर्णय खुद्द तामिळनाडू सरकारने घेतला. लोकभावना व सहानुभूती
अर्थात मारेकऱ्यांचा बाजूने. आता याकरिता राष्ट्रवादाची कुठली नवीन व्याख्या बनवावी?
यामुळे नेहमीच आपल्या सापेक्ष व सोयीच्या राष्ट्रवादाचे आश्चर्य वाटल्यावाचून राहत
नाही.
हीच गोष्ट आपल्या
जातीय संवेदनांची. एकच
घटना…. फक्त बळी
पडलेल्या व्यक्तीच्या जातीवर त्यावरील
प्रतिक्रिया अवलंबून असतात. जसे
कि वृत्तपत्रांचे मथळे
सजवणाऱ्या अजून एका
विद्यापीठाची गोष्ट… अर्थात हैद्राबाद
विद्यापीठ… रोहित वेमुला
या विद्यार्थ्याने केलेल्या
आत्महत्येस विरोधकांनी केंद्रातील भाजप
सरकारला दोषी धरले.
पण केंद्रात कॉंग्रेस
सरकार असतांना देखील
याच विद्यापीठातील दलित
विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
पाहणी केल्यास असे
दिसून येईल कि १९७० पासून
हैद्राबाद विद्यापीठात १२ विद्यार्थ्यांनी
आत्महत्या केल्या. त्यातील नऊ
जणांनी मागील दहा
वर्षात आत्महत्या केल्या
आहेत. आता मागील
दहा वर्षात केंद्रात
कुठले सरकार होते हे
काही वेगळे सांगावयास
नकोच.
आता साऱ्या देशातून
येऊयात आपल्या महाराष्ट्रात.
नगर जिल्ह्यातील पाथर्डी
तालुक्यातील एका गावात
एकाच कुटुंबातील तिघांची
हत्या झाली. आता
हे कुटुंब होते
दलित. माध्यमांनी यामागे
"ऑनर किलिंग" असण्याची शक्यता
व्यक्त केली. तशी
तक्रार घेऊन काही
राजकीय प्रतिनिधी राजभवनात
पोहोचले. राजभवनाकडून लगोलग या
कुटुंबियांना एका माणसामागे
पावणेचार लाखाची मदत
जाहीर झाली. त्यानंतर
वर्षभरात घडलेली दुसरी
घटना.
कोल्हापुरात नवपरिणीत कुलकर्णी दाम्पत्याची
राहत्या घरी निघृण
हत्या झाली. या
घटनेतील धक्कादायक सत्य
म्हणजे हि हत्या
मयत मुलीच्या भावांनीच
केली. आंतरजातीय विवाह
केला म्हणून भावांनी
आपल्या सख्या बहिणीसह
तिच्या नवऱ्याचीही हत्या
केली. या
प्रकरणाची माध्यमांनी फारशी दखलही
घेतली नाही. त्यामुळे
इंद्रजीत कुलकर्णी मागे त्याचे
कुटुंबीय निराधार वगैरे झाले
का हे कळावयास
मार्ग नाही. यामुळेच त्याला
आर्थिक मदतीची गरज
होती का, हे कळायला देखील
मार्ग नाही. पण
बिचाऱ्या इंद्रजीत कुलकर्णीच्या जागी
कुणी दलित मुलगा
असता, तर आत्तापर्यंत
राज्यातील व केंद्रातील
सरकारला मनुवादी ठरवून
तथाकथित पुरोगाम्यांनी व
माध्यमांनी काय थयथयाट
केला असता हे त्याचा तोचि
जाणे…
शेवटी जाता जाता…. हरियाणात आरक्षण मागणाऱ्या
जाट बांधवांनी मोठे
आंदोलन केले. राष्ट्रीय
महामार्ग अडवून साऱ्या
देशास वेठीस धरले.
हजारो कोटींची सार्वजनिक
मालमत्ता जळून खाक
झाली. शिवाय औद्योगिक
आस्थापना व कार्यालये
बंद राहिल्याने झालेले
नुकसान वेगळेच… फक्त कल्पना
केली कि असेच हिंसक आंदोलन
"मुस्लिम" बांधवांनी कुठल्याही राज्यात
केले तर…??? जाऊ दे… कधी कधी कल्पनेपेक्षा
वास्तव अधिक चांगले
असते…
- सुमित
कापुरे
०२/०३/२०१६, ठाणे
Comments
Post a Comment